Latest News

थंडीतील आरोग्याचे प्रश्न..

Image result for health in cold season
हिवाळ्यात वातावरण कसं असतं, मस्त गाऽऽर…अगदी थंड
वाटतं थंडीत कधी, करूच नये निद्रादेवीशी बंड ॥
रखरखीत उन्हाची काहिली देणारा उन्हाळा, चिंब भिजवणारा पावसाळा आणि थंडीने हुडहुडी भरायला लावणारा हिवाळा अशा तीन ऋतूंपैकी गुलाबी थंडीचा हिवाळा प्रत्येकालाच हवाहवासा असतो. हिवाळा सुरू झाला आणि थंडीची चाहूल लागली की अडगळीत पडलेले स्वेटर, मफलर तसेच लहान मुलांच्या कानटोप्या, पायमोजे बाहेर येऊ लागतात. मुळात वातावरणात गारवा असल्याने हिवाळ्यात इतर ऋतूंच्या तुलनेत पचनशक्ती चांगली असते.

थंडीची मौज प्रत्येकालाच स्वर्गीय सुखकारक वाटत असली तरी थंडीत आरोग्याचेही अनेक प्रश्न निर्माण होत असतात.  हिवाळ्यात सर्वप्रकारचा समतोल आहार घ्यावा. विशेषत: या काळात शरिरातील रुक्षता वाढत असल्याने स्निग्ध पदार्थांचे सेवन वाढवावे.

हिवाळ्यात विशेषत्त्वाने काजू, बदाम, अंजीर, आक्रोड, खारीक, खोबरे, बेदाणे इत्यादी पदार्थांचं सेवन आपल्या प्रकृतीनुसार वाढवावं. हिवाळ्यात डिंक, सुकामेवा, बेसन, मेथी इत्यादींचे साजूक तुपात तळलेले लाडू शरिराला बलवर्धक ठरतात. 

हिवाळ्यात रात्र मोठी आणि दिवस तुलनेने लहान असतो त्यामुळे या काळात वारंवार भूक लागते. त्यामुळे सकाळी नाश्ता, दुपारी जेवण, रात्रीचं जेवण गरमागरम आणि पौष्टिक घ्यावं. या काळात सर्व प्रकारच्या पालेभाज्या, फळे, फळांचा रस सेवन करावा. मात्र ज्यांना वजन कमी करायचे आहे किंवा मधुमेहासारखा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी आहारतज्ज्ञ किंवा आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊनच आहारात बदल करावेत.

थंडीत मुख्यत्वेकरून सांध्यांचे जुनाट आजार, त्वचेच्या समस्या त्याचप्रमाणे फ्रॅक्चर झालेल्या हाडांच्या समस्या तोंड वर काढतात. नेहमी दुखत असलेल्या शरिराच्या एखाद्या अवयवाचं दुखणं थंडीत असह्य होतं. थंडीत उद्भवणाऱ्या अशाच काही समस्यांचा आणि त्यांवरच्या उपायांचा परामर्श आपण आज घेणार आहोत.
  •  सांधेदुखी
थंडीच्या दिवसांत मुख्यत: सांधेदुखीची समस्या डोकं वर काढते. सांधेदुखीचा त्रास असणाऱ्यांनी थंडीत सांध्यांची विशेष काळजी घेण्याची गरज असते. सांध्यांना थंड हवा लागू देऊ नये त्याचप्रमाणे पायांना, हातांना मोजे वापरावेत. थंड पाण्यात काम करणं टाळावं. शिळं आणि थंड अन्न घेऊ नये. बटाटे, उसळी, ब्रेड तसेच बेकरीचे पदार्थ, डाळी आणि डाळींच्या पीठाचे पदार्थ टाळावेत.

मांसाहार पूर्णत: वर्ज्य करावा. गरम, ताजे अन्न घ्यावे. थंड पाण्यापेक्षा कोमठ पाणी प्यावं. सांधेदुखीचा त्रास असणाऱ्यांनी थंडीच्या दिवसांत अतिश्रम करणं टाळावं. रात्री झोपताना सांध्यांना एरंडेल तेलाने मालिश करावं. विविध प्रकारचे गुग्गुळ, दशमुळांचा काढा तसेच इतर वनौषधींचा उपयोग वैद्यकीय सल्याने केल्यास सांधेदुखीचा त्रास आपण टाळू शकतो. 
  • दमा
दम्याचा त्रास असणाऱ्यांना हिवाळा अत्यंत तापदायक ठरू शकतो. थंडीत छातीत कफ साचण्याची शक्यता जास्त असल्याने दम्याचा त्रास वाढू शकतो. म्हणून दम्याचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी थंड पाणी, आईसक्रीम, कोल्ड टी तसेच कोल्ड कॉफी तसेच विविध शितपेयं कटाक्षाने टाळावीत. दही, ताक, दूध, मिठाई दम्याच्या त्रासाला आमंत्रण ठरू शकतात त्यामुळे अशा पदार्थांचं सेवन टाळावं.

दम्याचा त्रास असणाऱ्यांनी पाणी सहसा कोमठ करून प्यावं. सुंठ आणि मध किंवा आल्याचा रस आणि मध हे मिश्रण दम्याच्या रुग्णांसाठी हिवाळ्यात आरोग्यदायी ठरतं. रात्री झोपताना तसेच सकाळी अंघोळीपूर्वी छातीला तीळतेल, महानारायण तेल लावून दररोज शेक घ्यावा त्यामुळे छातीत साचलेला कफ मोकळा होण्यास मदत होते.
 दम्याचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी तज्ज्ञांच्या सल्ल्याने प्राणायाम, कपालभारतीसारखे श्वसनसंस्थेशी संबंधित व्यायाम करावेत. च्यवनप्राश, सितोपलादी चूर्ण इत्यादी आयुर्वेदिक उपायही तज्ज्ञांच्या सल्ल्याने करावेत. 
  • तळपायाच्या भेगा
हिवाळ्यात अनेकांच्या हातापायांच्या तळव्यांना भेगा पडतात.  थंडीमध्ये शरिरात रुक्षता म्हणजेच कोरडेपणा येतो आणि हातापायाच्या तळव्यांवरील त्वचा फाटते. त्वचा फाटल्याने भेगा तयार होता आणि त्या दुखतात किंवा अशा भेगांची आग होते. हातापायांच्या तळव्यांना भेगा पडण्याचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी आहारात साजूक तुपाचा समावेश करावा. आहारात दूध, तुपासारखे स्निग्ध पदार्थ वाढवावेत. लोणचे, मिरचीचा ठेचा तसेच अतितिखट पदार्थ कटाक्षाने टाळावेत. जागरणामुळेही शरिरात रुक्षता वाढत असल्याने रात्री जागरण करणं टाळावं. रात्री झोपताना भेगांना साजूक तूप लावावे. चंदन, लाख, ज्येष्ठमध त्याचप्रमाणे तज्ज्ञांच्या सल्ल्याने विविध औषधी तेल भेगांवर लावावीत. 
  • त्वचेची काळजी
हिवाळ्यात साधारणपणे रात्री थंड आणि दिवसा कडक उन असं वातावरण असल्याने त्वचेच्या समस्या निर्माण होऊ शकतात. थंडीमुळे त्वचेतल्या तैलग्रंथी निष्क्रीय होऊन त्वचा निस्तेज आणि रखरखीत बनते. चेहऱ्यावर सुरकुत्या, त्वचा फाटणे, ओठ फुटणे अशा तक्रारी वाढतात. म्हणून हिवाळ्यात त्वचेची खास काळजी घ्यावी लागते. घराबाहेर पडताना चांगले विंटरकेअर लोशन वापरावे. असे विंटरकेअर लोशन आयुर्वेदिक असेल तर उत्तमच.

अंघोळीनंतर घरगुती उपाय म्हणून खोबरेल तेल, तिळाचे तेल, साय, लोणी तसेच तुपाचाही वापर क्रीमऐवजी करावा. हिवाळ्यात त्वचा स्निग्ध आणि कांतीमय ठेवण्यासाठी आहारात थोडे बदल करावेत. मोसंबी, हिरव्या भाज्या, पालेभाज्या, सॅलडचे आहारातील प्रमाण वाढवावे.

No comments:

Post a Comment

The Warrior Designed by Templateism.com Copyright © 2014

Theme images by nicodemos. Powered by Blogger.