प्रत्येक विश्वघटकाची निर्मिती चण्डिकाकुलातूनच होते, लयही चण्डिकाकुलातच होतो आणि निर्मिती व लय ह्यांमधील स्थिति व गति घडवून आणणारे, विश्वाला संचालित व अनुशासित करणारेही चण्डिकाकुलच आहे. प्रत्येक विश्वघटक चण्डिकाकुलाच्या अधिकारक्षेत्रातच असतो.
चण्डिकाकुलात आदिमाता चण्डिकेसह ज्येष्ठ चण्डिकापुत्र श्रीगुरुदत्तात्रेय, दत्तात्रेयांचेच प्रतिरूप असणारा महाप्राण श्रीहनुमंत, द्वितीय चण्डिकापुत्र किरातरुद्र (सदाशिव), किरातरुद्राची सहधर्मचारिणी शिवगंगागौरी आणि तृतीय चण्डिकापुत्र परमात्मा (परमशिव) (त्याची शक्ती आह्लादिनी व त्याचा अनुचर आदिशेष यांसह ) विराजमान असतात.
प्रत्येक मानवाची प्रार्थना येऊन पोहोचते, ती या चण्डिकाकुलाकडेच आणि त्या त्या मानवाच्या भक्तीनुसार त्या प्रार्थनेला प्रतिसाद मिळतो, तोदेखील चण्डिकाकुलाकडूनच.
बाह्य आणि अन्त:सृष्टीचे सन्तुलन उचित बिन्दुवर सांभाळणे हे किरातरुद्र आणि शिवगंगागौरी यांचे महत्त्वाचे कार्य आहे. पावित्र्याला स्तंभ म्हणजेच आधार देणे, उचिताला प्रेरणा देणे आणि अनुचिताचे स्तंभन करणे हेच कार्य श्रद्धावानांसाठी हे दोघे सदैव करत असतात.
मानवाचे मन हे एक जंगल आहे. अहंकार, षड्रिपु आदि अनेक हिंस्र श्वापदे म्हणजेच दुर्वृत्ती त्यात वावरत असतात. त्यांचा सामना करण्यात मानवाची कुवत तोकडी पडते. प्रत्येकाला त्याचे स्वत:चे युद्ध एकट्यानेच लढायचे असते.
मानव जेव्हा सद्गुरुतत्त्वाची (परमात्म्याची) भक्ती करू लागतो, तेव्हा त्याला क्षणिक मोहांवर विजय मिळविण्याचे सामर्थ्य परमात्म्याकडून प्रदान केले जाते. यातूनच या अरण्यात पर्वतशिखरांची निर्मिती होते. त्याचबरोबर परमात्म्याच्या श्रद्धावानांसाठी किरातरुद्र सक्रिय होतो आणि या मनोरूपी जंगलात पर्वतशिखरांच्या अग्रावर राहतो.
हिंस्र श्वापदांची शिकार हा त्याचा छंद आहे आणि श्रद्धावानांना अभय देणे ही त्याची सहज लीला आहे. किरातरुद्र या जंगलातील सर्व श्वापदांचा म्हणजेच दुर्वृत्तींचा नाश करतो आणि श्रद्धावानाचा विकास घडवून आणतो.
प्रत्येक मानवास त्याचा समग्र विकास साधण्यासाठी चिन्तन, शोध आणि अभ्यास यांची गरज असते.
या तीनही तत्त्वांचा समतोल साधण्याचे सामर्थ्य श्रद्धावानांना त्रिपुरारि पौर्णिमेस त्रिपुरारि त्रिविक्रम
परमात्मा, त्याची शक्ती आह्लादिनी, किरातरुद्र आणि शिवगंगागौरी यांच्याकडून सहजपणे प्राप्त होत असते.
यासाठीच त्रिपुरारि पौर्णिमेस पवित्र संकल्प करून तो पूर्ण होण्यासाठी किरातरुद्र पूजन आणि
त्याची प्रार्थना केली जाते..
ॐ महावैश्वानराय विद्महे। राघवेन्द्राय धीमहि।
तन्नो किरातरुद्र: प्रचोदयात्।।
-By Yogindrasinh Joshi
No comments:
Post a Comment