Latest News

Thursday Discourse dated 21 April 2011


सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंचे प्रवचन (२१-०४-२०११) 
हरी ॐ

श्री वरदाचण्डिका प्रसन्नोत्सवाची तारीख जवळ येत आहे. सगळीकडे उत्सवाची तयारी जोरात सुरु झाली आहे. माझी (प.पू.बापु) आईसुद्धा उत्सवाला येण्यासाठी तयारीला लागली आहे. ह्या उत्सवामध्ये काय असेल ते आधी बघूया. श्री वरदाचंडिका प्रसन्नोत्सव उत्सवात महापुजनची पहिली batch सकाळी ७ वाजता सुरु होईल व ८.३० पासुन रक्तदंतिकेचे पुजन सुरु होईल. मातृवात्सल्यविन्दानम्‌  ग्रंथात आपण बघतो की आदिमातेने केलेल्या आज्ञेनुसार श्री गुरुदत्तात्रेयांकडुन श्रवण केलेल्या व स्वत: अनुभवलेल्या  चन्डिकेच्या आख्यानाचा उपदेश श्री परशुरामांनी आदिमातेच्याच आज्ञेनुसार आपल्या तीन शिष्यांना ऋषी सुमेधस, ऋषी हरितायन, व ऋषी मार्कण्डेय ह्यांना केला. ह्यामधुन ऋषी सुमेधसाने "दुर्गा सप्तशती" आख्यान लिहिले, ऋषी हरितायनाने "त्रिपुरारहस्य", तर ऋषी मार्कण्डेयाने "मार्कण्डेय पुराण" लिहिले.

आपल्या उत्सवात होणार्या सहस्त्रचण्डि यज्ञाचे वर्णन दुर्गा सप्तशती मध्ये आढळते. दुर्गा सप्तशती हा ग्रंथ यज्ञा करिताच लिहिला गेला आहे. सहस्त्रचण्डि यज्ञ म्हणजे ह्या ग्रंथाचे १००८ वेळा पठण व त्याच पटीत हवन. हा खुप खर्चिक व दुर्मिळ (rarely) होणारा यज्ञ आहे. ह्या उत्सवात मी (प.पू.बापु) निवडलेल्या पुरोहितांद्वारे हा यज्ञ होणार आहे. तर नवचण्डी यज्ञ २२ व २३ एप्रिलला गुरूक्षेत्रमला होणार आहे, हा नवचण्डी यज्ञ सुद्धा शुभंकर ताकद वाढवणारच आहे. नवचण्डी म्हणजे नऊ पाठ असेच शतचण्डी, व सहस्त्रचण्डी.

आता सहस्त्रचण्डि यज्ञाविषयी थोडक्यात माहिती बघु. ह्यात अग्नीमंथन पध्दतीने (लाकूड एकमेकांवर घासुन) अग्नी निर्माण करुन नंतर योगिनी मंडलाचे पठण होणार आहे. नंतर  क्षेत्रपालाचे पुजन (प्रत्येक जागेचा जो रक्षक त्याला क्षेत्रपाल म्हणतात), भैरव मंडल पुजन, प्रधान मंडलाची स्थापना, ११ रुद्रांचे पुजन, दररोज वेगवेगळ्या द्रव्यांचे अर्चन अश्या प्रकारचे बरेच विधी होणार आहेत. ह्याची विस्तृत माहिती लवकरच उपलब्ध होईल.

ह्या यज्ञाचे साहित्य बघूया. साहित्यामध्ये ह्यात ५ किलो कुंकू, ५ किलो साधा कापूर, २ किलो भिमसेनी कापूर, १२५ किलो तुप, २५ किलो सुपार्या, ५ किलो हळकुंड, केशराच्या ५० डब्या, श्वेत चंदनाची पावडर ५ किलो, गायीचे तुप ३०० किलो, काळे तीळ २०० किलो, जव १५० किलो, आंब्याचे लाकुड १००० किलो, ५ मीटर लाल वस्त्र, १०८ सप्तशती ग्रंथ, १५० फळे, ह्यात महाकाली, महासरस्वती, महालक्ष्मी ह्यांच्या सोन्याच्या यंत्रमय प्रतिमा, चांदीची शंकराची पिंड, चांदीचा रथ, पंचधातुचे शंख, ११०० विड्याची पाने, २१ वेण्या, २१ हार, २४ किलो दुधी भोपळा, २४ किलो काकडया, १०० लिटर दुध, १०० कटोऱ्या, १००० द्रोण, १००० पत्रावळ्या, इत्यादी.... ही लिस्ट भरपुर मोठी आहे पुर्ण सांगायची झाली तर सगळे प्रवचन त्यावरच  होईल. 
ह्यावरुन तुम्हाला थोडक्यात अंदाज येईल की हा सहस्त्रचण्डि याग किती मोठा आहे. ह्यापेक्षा जास्त सामुग्री ही महापुजनासाठी लागणार आहे.

म्हणजेच तुमच्या लक्षात येईल की हा उत्सव किती भव्य आणि दिव्य होणार आहे. प्रेमाने जेवढया वेळा दर्शन घेता येईल तेवढे घ्या, पण मध्येच रांगेत घुसुन चोरुन दर्शन घेवू नका. उत्सवातील प्रत्येक गोष्टींचा व्यवस्थित फायदा घ्या. 
"उतून चालला आहे खजिना .."

खजिन्याचे कुलुप उघडलेले आहे, तुम्ही किती लुटुन नेणार हे तुमची झोळी किती मोठी आहे त्यावर अवलंबुन आहे. त्यामुळे झोळी वाढवा आणि खजिना उदंड भरुन न्या.

"जयंती मंगला काली.." गजर संपला, नावे बघुन झाली. उत्सवात देवीची स्तोत्रे, मंत्र जी घेतली जाणार आहेत त्या प्रत्येकावर बोलायचे झाले तर प्रत्येकासाठी २-३ प्रवचने होतील. प्रत्यक्षाच्या अग्रलेखांमधुन आपण आता हास्य बघतो आहोत, पुढे तांडव बघणार आहोत. ह्यात १० काळ, १० अवस्था बघितल्या. ह्यामध्ये काल म्रुत्यु कुठेच नाही. भारतीय संस्कृतीत एक जन्म ते दुसरा जन्म हा प्रवाह कुठेच खंडित नाही. ज्याप्रमाणे एक वस्त्र काढुन दुसरे घालतो तसेच एक जन्म ते दुसरा जन्म हा प्रवाह आहे. त्यामुळे मृत्यू ही संकल्पना भारतीय संस्कृतीत मान्य नाही.

श्वास आत घेण्याच्या क्रियेला संस्कृत मध्ये पुरक म्हणतात तर श्वास बाहेर टाकण्याच्या क्रियेला रेचक म्हणतात. श्वास आत घेवुन बाहेर टाकण्याच्या मधल्या काळाला अंर्त कुंभक तर श्वास बाहेर टाकल्यावर परत आत घेईपर्यंतच्या मधल्या काळाला बाह्य कुंभक म्हणतात. ह्याचाच अर्थ मृत्यू म्हणजे लांबलेला बाह्य कुंभक, ह्या जन्मात श्वास सोडला पुढच्या जन्मात श्वास घेतला. म्हणून मृत्यू ही जराही घाबरण्याची अवस्था नाही. हा काळ कधी १० वर्षाचा असेल तर कधी १०० वर्षाचा...हा मधला काळ वाढला की आपण घाबरतो. लक्षात ठेवा मानवा़ची १०० वर्षे म्हणजे परमात्म्याचे एक निमिष (डोळे मिटुन उघडणे). बाह्य कुंभक जास्त वाढला कि आपण त्याला लौकिक मृत्यू मानतो. भारतीय संस्कृतीत मृत्यूनंतर जीव परमात्म्याकडे जातो. सच्चा श्रद्धावान मृत्यूनंतर आपल्या बापाला भेटण्यास आतुर असतो. मृत्यू म्हणजे  extened ( लांबलेला) बाह्य कुंभक म्हणुन भारतीय संस्कृतीत मृत्यूची भीती नाही. सद्‌गुरु तत्त्वावर विश्वास ठेवणारा मृत्यूला घाबरत नाही. कारण त्याचा extened  बाह्य कुंभक केवढा ठेवायचा ते सद्‌गुरु ठरवतो.

"ज्याचे हृदयी श्रीगुरु स्मरण, त्यासी कैचे भय दारुण ||
काळमृत्यू न बाधे जाण, अपमृत्यू  काय करी ॥"

आदिमाता चण्डिकेच्या आज्ञेने हा परमात्मा ह्या बाह्य कुंभक व अंर्त कुंभक ह्यांचे नियंत्रण करतो. जे श्रद्धावान नाहीत त्यांचा मृत्यू  कलिपुरुष ठरवतो. तर जो श्रद्धावान असतो त्याचा अंर्त कुंभक व बाह्य कुंभक परमात्मा ठरवतो, त्याची आई ठरवते. कलिपुरुष हा आदिमातेचे नियम पाळत नाही म्हणुनच हा मोहात मानवाला पाडून षड्ररिपूंना बलवान करुन यातना देणारा असतो. तर परमात्मा हा मानवासाठी जे उचित आहे उपयुक्त आहे ते ठेवुन, वाईट तेवढे बाजुला काढणारा असतो.

श्री वरदाचण्डिका प्रसन्नोत्सव करण्यामागे माझा (प.पू.बापू) महत्त्वाचा हेतु हा आहे की, माझे श्रद्धावान जे आहेत त्यांचे अंर्त कुंभक व बाह्य कुंभक हे कलिपुरुषाच्या हातात ह्याच्यापुढे कधीच जावू नयेत.

ह्या उत्सवात मातृवात्सल्यविन्दानाम्‌ ह्या ग्रंथाच्या संस्कृत संहितेचे सतत पठण असणार आहे. ह्या उत्सवात जो जो श्रद्धावान येईल त्याचे अंर्त कुंभक व बाह्य कुंभक हे कलिपुरुषाच्या तावडीतुन सुटुन परमात्म्याकडे येणारच.

ह्या उत्सवात गंगामाता अवतरणार आहे, इथे जे गंगामातेच्या पात्रात पाणी असेल ते डोळ्याला किंवा डोक्याला लावु शकता पण ते उत्सव चालु असताना पिऊ नका किंवा बाटलीत भरुन घेवु नका. कारण माझा (प.पू.बापू) संकल्प असा आहे की, उत्सवाच्या १० दिवसात विविध मंत्रोपचार झाल्यावर तुमच्या सगळ्यांसाठी ते सहन होईल अश्या अवस्थेत ते तुम्हांला उत्सवानंतर मिळावे.

इथे जी गंगामाता अवतरणार आहे ती त्रिपथगामिनी आहे, भागिरथी, अलकनंदा, मंदाकिनी अशी तिची तिन्ही रुपे इथे एकत्रित असणार आहेत. म्हणुन तिला स्पर्श करा पण प्राशन करु नका. उत्सवानंतर अगदी गरीबातलीगरीब व्यक्ती देखील ते गंगाजल घेऊ शकेल व आपल्या घरी ठेवु शकेल अश्या तर्हेने ते जल संस्थेतर्फे सर्वांसाठी उपलब्ध होणार आहे. हे गंगाजल पुष्कळ मोठया प्रमाणात आपल्या कार्यकर्त्यांनी आणले आहे त्यामुळॆ, "मला मिळेल की नाही?" असा विचारही मनात आणु नका. प्रत्येकाला हे गंगाजल मिळणार आहे ह्याची खात्री बाळगा. आणि एक गोष्ट सांगुन ठेवतो जेथुन हे जल आणले आहे त्या १०८ नद्या, ते सप्त समुद्र, ते मानस सरोवर इथे दररोज उत्सवाला दर्शनासाठी येणार आहेत त्यामुळे जर समजा जल कमी पडलेच तर मी (प.पू.बापू) त्यांच्याकडॆ शब्द टाकेन ते आनंदाने तयारच आहेत त्यांचे जल ह्या उत्सवासाठी द्यायला. अतिशय दुर्मिळ असा हा उत्सव आहे त्यामुळे सत्ययुगापासुन ह्या उत्सवासाठी तिष्ठत असणारी सर्व दैवते ह्या उत्सवाला येणारच आहेत.

ह्या उत्सवात सगळी स्तोत्रे माझ्या (प.पू.बापू) आवाजात तुम्हांला ऐकावी लागणार आहेत. त्यातल्या काही अत्यंत महत्वाच्या स्तोत्रांची CD सर्वांसाठी लवकरच उपलब्ध होणार आहे तसेच मातृवात्सल्यविदानाम्‌ ह्या ग्रंथाचा संस्कृत पाठ माझ्या (प.पू.बापू) आवाजात तर आई अनसुयेची आरती तुमच्या लाडक्या नंदाईच्या आवाजात व महिषासुरमर्दिनी स्तोत्र सुचितदादांच्या आवाजात असलेली CD देखील सर्वांसाठी उपलब्ध होणार आहे. 

ह्या CD काढण्यामागे माझे (प.पू.बापू) दोन हेतु आहेत ते म्हणजे ह्या उत्सवातील पुजनाचा महत्वाचा भाग हा कायम तुम्हा सगळ्यांसोबत रहावा व जे ह्या उत्सवाला येऊ शकणार नाहीत त्यांच्या घरातही हे मंत्र सर्वांना ऐकायला मिळावेत.

इथे प्रत्येक उचित गोष्ट मिळेल, त्याचा नीट सर्वांनी अंगिकार करा. कलिपुरुषाच्या ताब्यात असलेले तुमचे जीवन मला बघवत नाही. चांगले करायला जावे आणि वाईट गोष्टीत अडकावे, अंग धुवायला जावे आणि चिखलात लोळावे, अन्न ग्रहण करायला जावे आणि त्यात कावळ्याने विष्टा टाकावी असे तुमचे जीवन झाले आहे, हे मला (प.पू.बापू) बघवत नाही.

अनेक प्रयत्न करुनही चुका घडतच आहेत हे मला मान्य आहे, पण जर तुम्ही श्रद्धावान असाल तर तुम्हांला त्या चुकांच्या प्रभावापासुन दुर करणे मला सोपे पडते. जेवढे तुम्ही नीट वागाल तेवढे मग माझे कष्ट कमी होतात. तुम्ही कसेही वागलात तरी माझा स्वभावच असा आहे की, मी (प.पू.बापू) माझ्या मित्रांसाठी धावुन येणारच. त्यांमुळे माझे कष्ट वाढवायचे की कमी करायचे ते तुम्ही ठरवायचे. जो जो माझ्यावर मनापासुन प्रेम करतो त्याचे मला कष्ट पडत नाहीत, कारण प्रेम हाच माझा (प.पू.बापू) श्वास आहे. जर माझ्यावर प्रेम नसेल तर मला कष्ट पडतील. मग मला कष्ट पडू द्यायचे की मला आनंद द्यायचा हे तुमच्यावर आहे. 

ह्या CD तुम्हांला खुप काही भरभरुन देतील. कारण ह्या CD  मधुन प्रत्येक श्रद्धावानाला मिळणार आहे ते फक्त पावित्र्य, सौंदर्य व पराक्रम.पुढच्या गुरुवारी आपल्याला शंकराचार्यांचे देवी अपराध क्षमापन स्तोत्र  बघायचे आहे. हे स्तोत्र माझे (प.पू.बापू) अत्यंत लाडके स्तोत्र आहे. माझी (प.पू.बापू) आई किती प्रेमळ आहे हे ह्या स्तोत्रातुन बघुन आपल्याला ह्या उत्सवाला जायचे आहे. लेकरे कितीही टवाळ असली तरी ही मोठी आई कधीच कुमाता बनत नाही.
आपल्या शरीराला, मनाला व प्राणाला आंघोळ घालणारे हे स्तोत्र आहे. हे स्तोत्र आपल्याला समजुन घ्यायचे आहे पुढच्या गुरुवारी आपल्या आदिमातेच्या स्वागतासाठी..

हरी ॐ 

No comments:

Post a Comment

The Warrior Designed by Templateism.com Copyright © 2014

Theme images by nicodemos. Powered by Blogger.