Latest News

जाण रे जाण तू या त्रिपुरारीला..



श्रद्धावानानो  "श्री अनिरुद्ध पौर्णिमा" उत्सवात सहभागी होवून श्रद्धावानांसाठी नित्य प्रवाहित होणाऱ्या व श्रद्धावानांना शुद्ध करणाऱ्या श्री अनिरुद्धांच्या प्रेमरूपी तीर्थगंगेत न्हाउया व अनिरुद्ध कृपा प्राप्त करूया.

"श्री अनिरुद्ध पौर्णिमा " शनिवार  दिनांक. : १२ नोव्हेंबर २०११ "श्री हरीगुरूग्राम" वांद्रे (पु.)  मुंबई  येथे साजरी होणार आहे.

"जाण रे जाण तू या त्रिपुरारीला,  दाता अनिरुद्ध गायत्री नंदन आला."

सद्गुरू श्री अनिरुद्धांचा आधार जाणणे म्हणजेच मानव जन्माचे सार्थक करणे अर्थात "जाणा येथे आहे सहाय्य सर्वांस" कारण....
१) ह्याच त्रिपुरारी पौर्णिमेला श्री गायत्री मातेने अनिरुद्धाना नवअंकुर  ऐश्वर्याने सिद्ध करून सर्व विश्वाच्या कल्याणासाठी भूलोकी पाठवले आहे.

२) ह्याच त्रिपुरारी पौर्णिमेला अनिरुद्धांची आजी श्रेष्ठ विठ्ठलभक्त शकुंतला पंडित ह्यांनी बाल अनिरुद्धाना वयाच्या आठव्या वर्षी मुंबई वडाळा येथील विठ्ठल मंदिरात नेले व आजपासून ह्याला "बापू" म्हणायचे असे सर्वाना सांगून अनिरुद्धांचे "बापू" हे नामकरण केले.

३) ह्याच त्रिपुरारी पौर्णिमेला परमात्म्याने शिव स्वरुपात त्रिपुरासुराचा वध  केला म्हणून तिला 'त्रिपुरारी पौर्णिमा' म्हणतात. तर त्रिपुरारी पौर्णिमेला अनिरुद्ध दत्तगुरू व गायत्री मातेच्या आज्ञेने भूलोकी आले म्हणून श्रद्धावान कार्तिक महिन्याच्या ह्या पौर्णिमेला "अनिरुद्ध पौर्णिमा"  म्हणतात.

१) श्री अनिरुद्ध पौर्णिमेला श्रद्धावान हरिहर स्वरूप असलेल्या त्रिविक्रमाचे तुलसी व बेल वाहून पूजन का करतात?
अनिरुद्ध पौर्णिमेला अर्थात त्रिपुरारी पौर्णिमेला हरी व हर एकमेकांना समानपणे भेटतात. जो हरिहर अनिरुद्ध आहे तोच हरिहर स्वरूप त्रिविक्रम आहे म्हणून हरिहर स्वरूप असलेल्या त्रिविक्रमाचे श्रद्धावान तुलसी व बेल वाहून पूजन करतात.

२) सद्गुरू श्री अनिरुद्धांचे 'अनिरुद्ध' हे नाम कोणी ठेवले?
            श्री गोपीनाथशास्त्री जगन्नाथशास्त्री पाध्ये हे श्री अनिरुद्धांचे मानवी गुरु हे अत्यंत कुशाग्र बुद्धीचे होते. सर्व वेद व शास्त्रांत ते अत्यंत पारंगत व विद्वान म्हणून त्याकाळी ते प्रसिद्ध होते. त्यांना श्री विठ्ठल परमात्म्याने व श्री स्वामी समर्थांनी दिलेल्या अनुभूतीप्रमाणे त्यांच्या नातीच्या उदरी 'त्रिपुरारी पौर्णिमेला' "तो" येणार ह्याची त्यांना खात्री झाली होती. 

गोपीनाथ शास्त्रींची कन्या मालती पाध्ये तीच विवाहानंतरची शकुंतला पंडित. तिची कन्या अरुंधती तीच गोपीनाथ शास्त्रींची नात व लग्नानंतरची सौ. अरुंधती धैर्यधर जोशी.
             श्री स्वामी समर्थांनी शकुंतला पंडित यांचे पती नरेंद्रनाथ पंडित यांना दिलेल्या दृष्टांताप्रमाणे अरुंधतीच्या पोटी त्रिपुरारी पौर्णिमेला 'दिव्य नील तेज' अवतीर्ण झाले .. तोच तो 'अनिरुद्ध' जन्मदिवस त्रिपुरारी पोर्णिमा १८ नोव्हेंबर १९५६.  त्या अनिरुद्धांचे "अनिरुद्ध" हे नाम १६ वर्षे आधीच श्री गोपीनाथ शास्त्रींच्या इच्छे  प्रमाणे शकुंतला पंडित (अनिरुद्धांच्या आईच्या आई) व द्वारकामाई (गोपीनाथ शास्त्रींची पत्नी) यांनी अरुंधती पुत्राचे नाम 'अनिरुद्ध' असे ठेवले.
                 हाच तो श्रद्धावानांच्या जीवनात श्रद्धावानांच्या दुष्प्रारब्ध नाशासाठी अवतरीत झालेला श्रद्धावानांचा सेनापती, महायोद्ध, व लाडका सद्गुरू... सद्गुरू श्री अनिरुद्ध बापू....

३) सद्गुरू श्री अनिरुद्ध त्रिपुरारी पौर्णिमेला का अवतीर्ण झाले आहेत?
              कारण असे आहे कि 'श्री अनिरुद्ध चालीसा' मध्ये अनिरुद्धांचे संकीर्तन करताना "कार्तिक मास कि पुरण मासी, प्रगत भरे जय जय त्रिपुरारी" असे संकीर्तन केले आहे. त्या कार्तिक पौर्णिमेचे महत्व काय? 
                   कार्तिक पौर्णिमेला पूर्णत्व असते म्हणून प्रत्येक श्रद्धावानासाठी सद्गुरुतत्वाचे गुरुतेज जशाच्या तशा स्वरुपात स्वीकारण्याची संधी सहजपणे उपलब्ध होते. जशी उर्जा आहे तशी उर्जा या दिवशी मूळ रुपात प्राप्त होते. राधा तत्वाचे  प्रेम मूळ तत्वाशी प्रगत होते.. ते याच दिवशी म्हणून अनिरुद्ध पौर्णिमेच्या दिवशी मला सद्गुरू श्री अनिरुद्धांकडून मिळालेलं प्रेम मला त्याच्याच चरणी प्रगट करता आल पाहिजे. जसे आपण नदीचे पाणी घेतो आणि नदीलाच अर्पण करतो तसे अनिरुद्धांचे प्रेम घ्यायचे व अनिरुद्धानाच  अर्पण करायचे, हे आपल्या हातून घडले कि अनिरुद्ध प्रेमाची नित्य उर्जा आपल्याला कधीच कमी पडणार नाही.

अनिरुद्ध प्रेम हीच माझ्यासाठी नित्य वाहणारी व मला शुद्ध करणारी पवित्र  तीर्थगंगा आहे. हि तीर्थगंगा श्रद्धावानांकडे प्रवाहित होते ती अशी...

१. जेव्हा आपण सद्गुरू अनिरुद्धांच्या लीलांचे, त्यांच्या गुणांचे संकीर्तन करतो तेव्हा त्यातून नित्य नूतन सद्गुरू प्रेम प्रवाहीत होत असते आणि सद्गुरूंच्या प्रेमाचा स्त्रोत सर्व सामर्थ्याचा स्त्रोत असल्यामुळे जीवन रसमय व तृप्त होते.

२. जेव्हा आपण सद्गुरू श्री अनिरुद्धांचे प्रेमाने नामसंकीर्तन करतो तेव्हा सद्गुरूचे नामस्मरण सद्गुरूंच्या प्रेमाला आपल्या मनात व बुद्धीत स्थिर करते व सद्गुरू भक्ती वाढीस लागते.

३.जेव्हा आपण सद्गुरू श्री अनिरुद्धांचे दर्शन घेतो तेव्हा सद्गुरू आपल्या मनाला बुद्धीशी जोडतो व उचित भक्ती घडून येते.

४. तसेच अनिरुद्ध नामाची, अनिरुद्ध रुपाची आणि अनिरुद्ध गुणसंकीर्तनाची तीर्थगंगा आपल्या जीवनात शुभ, मंगल आणि कल्याणकारी घटना घडवून आणते.

           अनिरुद्धांची हि तीर्थगंगा श्रद्धावानांकडे प्रवाहित होते ती अनिरुद्धांच्या महासिद्ध अमृतवाणीतून, त्यांच्या सहजसिद्ध लेखणीतून, त्यांच्या राजीवलोचनातून  व त्यांच्या पावन अशा हस्त व चरणकमलातून ...

श्रद्धावानानो श्री अनिरुद्ध पौर्णिमा हीच आपल्यासाठी गुरुपौर्णिमा आहे. गुरुपौर्णिमेलाही  कोणत्याही भौतिक रूपातील दक्षिणा न स्वीकारणाऱ्या अनिरुद्धाना आपण गुरुदक्षिणा काय देणार ? आपण सर्व जण   एवढेच सांगूया कि हे सद्गुरूराया अनिरुद्धा, तुझ्या कडून आम्हाकडे सतत वाहणाऱ्या तुझ्या अकारण करुण्याबद्दल आम्ही तुझे सदैव ऋणी आहोत. आम्ही तुझ्या आज्ञेचे पालन करू, तुझे प्रेम हेच आमचे सर्वस्व आहे.

म्हणून श्रद्धावानानो आपल्याला कधीही विस्मरण होऊ नये अशी गोष्ट म्हणजे.....
 "जाण रे जाण तू या त्रिपुरारीला,  दाता अनिरुद्ध गायत्री नंदन आला."

Source : श्री अनिरुद्ध गुरुक्षेत्रम

No comments:

Post a Comment

The Warrior Designed by Templateism.com Copyright © 2014

Theme images by nicodemos. Powered by Blogger.