Latest News

Thursday Discourse (24-02-2011)

हरि ॐ
सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंचे श्री हरि गुरु ग्राम येथील प्रवचन. (२४-०२-२०११)

         "दुर्गा क्षमा शिवा धात्री, स्वाहा स्वधा नमोस्तुते.."

            दुर्गा नाव आपण बघितले, त्यानंतर येते ती क्षमा. मनुष्य नेहमी जे जे चांगले करायचे ठरवतो ते ते नमके घडत नाही तर जे जे नाही करायचे असते तेच नेमके घडते.असे होणे म्हणजेच दुर्गती...म्हणून जी ही दुर्गती हारणारी दुर्गा ..तीच पुढे क्षमा बनून आमच्या जीवनात येऊ शकते.

            क्षमा म्हणजे नक्की काय ? हे आधी आपल्याला समजले पाहीजे. जे काही आतापर्यंत पाप केले ते सर्व पुसून शुन्य करणे म्हणजे क्षमा असे आपल्याला वाटते. देवाचे नाव घेतले म्हणजे आपण कितीही वाईट वागू शकतो असे काहींना वाटते. प्रत्येक जण आपापल्या परीने सोयीचा अर्थ काढत असतो. क्षमा समजून घेण्यासाठी प्रथम आपल्याला दुसऱ्यांना क्षमा करता आली पाहीजे. मनुष्य नेहमी स्वत:ला क्षमा करत असतो परंतु , दुसर्याला मात्र त्याला क्षमा करता येत नाही.

इथे एक लक्षात घेतले पाहीजे की, मला जर परमेश्वराकडून क्षमा हवी असेल तर मला प्रथम माझ्या आयुष्यातील इतर चांगल्या लोकांना त्यांच्या चुकांसाठी क्षमा करता आले पाहीजे. एखादी व्यक्ती ९९ वेळा माझ्याशी चांगली वागली असेल आणि एकदा जर वाईट वागली तर आपण ते वाईट लक्षात ठेवून त्या व्यक्तीशी लगेच बोलणे बंद करतो.

              नेहमी स्वत:च्या चुकांना मनुष्य माफ करत राहतो, स्वत:च्या चुकांसाठी परिस्थितीला कारणीभूत ठरवतो. अन्यायाच्या नावाखाली छोट्या-छोट्या गोष्टींवर चिडत असतो. इथे क्रोध तुमच्या मनातच असतो म्हणून तो व्यक्त होतो,हे मान्य करत नाही.तर त्यासाठी अनेक सबबी मात्र सांगत फिरतो.

जेव्हा एखादी व्यक्ती आयुष्यात फसते तेव्हा ती लगेच दुसर्यावर त्याचा आरोप करते,आपल्या फसवणुकी साठी दुसर्याला दोषी ठरवते. परंतु, जेव्हा एखादी व्यक्ती फसते तेव्हा ती कुठल्या ना कुठल्या लोभामुळेच फसत असते हे आपण नेहमी लक्षात ठेवले पाहीजे.

माणुस म्हटले की हातून चुका घडणारच पण महत्त्वाची गोष्ट इथे सांगावीशी वाटते की, एखाद्या चांगल्या मनुष्याच्या चुका जगभर सांगत बसू नका.

               मी (प.पू.बापू) नेहमी बघतो, ८० वर्षाची स्त्री देखील ५८ वर्षापुर्वी तिचा सासूने काय अपमान केला होता ह्यावरून नवर्याशी भांडताना दिसते.नवरा पण तेव्हा पत्नीचे वडिल कसे वागले ह्यावरून तिच्याशी वाद घालतो. इथे पती-पत्नीचे एकमेकांवर कितीही प्रेम असले तरी ते एकमेकांना क्षमा करत नाहीत. लग्नानंतरही "आमच्याकडचे - तुमच्याकडचे" ह्या गोष्टी संपत नसतात.विशेषत:स्त्रिया स्वत: सासू होईपर्यंत सासरच्या घराला "आमचे" घर म्हणत नाहीत.

आपल्या प्रेमाच्या व्यक्तीची एखादी गोष्ट चुकली असेल तरी ती किती काळ उगाळत बसायची?असे करत बसल्याने त्यात प्रेमाचे नाते उरतच नाही. लक्षात ठेवा ज्या प्रमाणात मनुष्य दुसर्यांना क्षमा करायला विसरतो त्या प्रमाणात त्याचा प्रवास कलीयुगाकडे होत असतो.

जे लोक मुळातच वाईट आहेत अश्यांबद्द् ल मी इथे बोलत नाही, पण ज्या आपल्या प्रेमाच्या व्यक्ती आहेत त्यांच्यांवर तरी चिडू नका. एखाद्या वेळी केलेली मस्करी वेगळी..पण जर तीच मस्करी परत परत घडली तर ती मस्करी उरत नाही, त्याची जागा क्रोध घेतो आणि मग तुम्ही हा राग बाहेर व्यक्त करायला निमित्त शोधत राह्ता.

पती-पत्नी जेव्ह्ढे एकमेकांना ओळखतात तेव्हढे दुसरे कोणीही ओळखु शकत नाही.जेव्ह्ढं आई आणि मुलाचे नाते पवित्र असते तेव्हढेच पती-पत्नीचेही नाते पवित्र असते.पतीच्या नुसत्या हालचाली वरुन देखील पत्नी त्याच्या मनातील भाव ओळखु शकते.तसेच आई-वडील देखील मुलांच्या हालचाली वरुन त्यांच्या मनात काय चालू असेल ते ओळखू शकतात. हे ज्ञान कशातून होते ? फक्त प्रेमातूनच...म्हणून क्षमा सुद्धा प्रेमातूनच येत असते.

जर पती- पत्नीचे एकमेकांवर प्रेम असेल आणि तरी एकमेकांच्या चुका काढत असतील तर खरच ते थांबवा. आज सर्व पुरुषांना मुद्दामहून एक सांगावेसे वाटते.."If you want to understand your wife you have to love her and once you love her then there 'No Need left' to Understand her !!! "

खरंच हे वाक्य जराही चूक नाही...कारण सगळ्या स्त्रियांकडे एकच rational असते ते म्हणजे हा माझा नवरा आहे..बस्स..बाकी काही नाही. स्त्री इतर सर्व आप्तांशी वागताना सुसंगत वागेल पण नवर्याशी मात्र नाही, कारण एकच भावना की, हा माझा आहे.

                इथे असं म्हणायचे नाही की नवर्याने पत्नीच्या मुठीत राहायचे. पुरुषाने नेहमी कर्ता, खंबीर असलेच पाहीजे. कारण ज्या घरातील स्त्री dominating असते, नवर्यावर ओरडत असते, त्या घरात मुलगे भित्रट तर मुली चालू बनतात.व ज्या घरातील पुरुष व्यसने करतो, पत्नीवर ओरडत राहतो त्या घरातील मुलगे बेछूट वागणारे तर मुली भित्रट बनतात. म्हणूनच आज इथे सांगावेसे वाटते की, जर नवरा-बायकोला भांडायचेच असेल ना तर खरंच मुलांसमोर कधीच भांडू नका..कारण लहान मुलांना क्षमा करता येत नाही.

       लहान मुले जे काही डॊळ्यांनी बघतात (घरातील मोठ्या व्यक्तींचे वागणे) ते ते सर्व आपल्या मनात तसंच्या तसे लिहून ठेवतात.त्यामुळे पुढे मोठेपणी ते पण तसेच वागतात. जर स्त्रीला वाटत असेल की आपल्या सुनेने, मुलाने आपल्याशी नीट वागावे तर आधी तिला आपल्या सासुशी नीट वागता आले पाहीजे, ती जसे वागणार ते बघुन तिचा मुलगाही तिच्याशी तसेच वागणार, हे लक्षात ठेवले पाहीजे, कारण मुलांकडे क्षमा हा गुण नाही.

               क्षमा हा फक्त परमेश्वराचाच गुणधर्म आहे, तो माणसाकडे उपजत नसतो, माणसाला हा गुण आत्मसात करावा लागतो. सत्त्व गुणाशिवाय क्षमा येत नाही, व क्षमेशिवाय सत्त्व गुण येत नाही. सत्त्व गुण हा भाव शारिरी गुणांपेक्षा वरचढ असणारा व दु:खांना दुर करणारा असतो.हा सत्त्व गुण येत असतो तो फक्त पवित्र आचरणातून, पवित्र आहार-विहारातुन म्हणजेच परमेश्वराचे गुणसंकीर्तनामधुन, तसेच इतरांच्या केलेल्या सेवेतुन.. जेव्हा आपल्याकडुन दुसर्यांना (आप्तांना) क्षमा केली जाते तेव्हा त्या क्षमेमधुन आपल्याला १० ग्रॅम क्षमा, १० ग्रॅम सुख, १० ग्रॅम दु:खाची निव्रूत्ती,१० ग्रॅम सत्त्व गुण प्राप्त होत असतो .

               क्षमा कोणाला करायची हे आम्हांला नीट कळले पाहीजे. क्षमा सुद्धा एक प्रकारचे दानच आहे .ते सत्पात्रीच व्हायला हवे..म्हणून आपल्या आप्तांना क्षमा करायला शिका. आपल्या प्रेमाच्या व्यक्तींना तुम्ही क्षमा करायला शिकलात की, ही चंडिका तुमच्या जीवनाची दुर्गती दुर करते...आणि तीच क्षमा असते हे लक्षात घ्या.

मनुष्य क्षमा कशी शिकतो हे बघणे पण खुप सुंदर आहे. लहान बालक पहिल्यांदा क्षमा करते ते आपल्या आईला..आपले बाळ एखादी गोष्ट चुकीची करत असेल तर आई त्याला फटके मारते..हे फटके म्हणजे त्या बाळासाठी टॉनिकच असते.कारण त्यामुळे बाळ चुकिच्या गोष्टींपासुन दुर होते. .ह्या ठिकाणी जरी आई फटके देत असली तरीही ते बाळ काही वेळाने जाऊन आईलाच बिलगते.ते तिच्यावर रागवत नाही..इथे हे बाळ पहिल्यांदा क्षमा करायला शिकते.म्हणुनच क्षमा ही फक्त प्रेमातुनच येत असते.

           असेच परमेश्वराकडेही मला ती माझी आई आहे ह्याच भावाने बघता आले पाहीजे. परंतु मनुष्य परमेश्वराला कधीच क्षमा करत नाही. सगळे चांगले घडत असताना एखादी वाईट गोष्ट घडली तर लगेच त्यासाठी परमेश्वराला दोष दिला जातो.

जेव्हा एखादी हवी असलेली गोष्ट मिळत नाही अश्या वेळी परमेश्वराकडे ती आई आहे व ती जे हिताचे असेल तेच देणार ह्या लहान बाळाच्या भुमिकेतूनच आपल्याला बघता आले पाहीजे.

          इथे माझ्या (प.पू.बापू) माईचे एक उदाहरण सांगावेसे वाटते, एकदा घरात काही कार्य असल्याने बरीच मंडळी होती. माई नेहमीप्रमाणे देवाची एक जपमाळ पुर्ण करुन उठली, तेव्हा तिथे काही खेळ्णी पडली होती,त्यामुळे तिच्या पायाला ठेच लागली. तेव्हा तिथे जमलेल्या काही स्त्रियांपैकी एक जण म्हणाली, "एवढी देवाची माळ करुन पण पायाला ठेच लागली, काय उपयोग झाला देवाचे नाव घेवून ?"
त्यावर माईने उत्तर दिले, "माळ केली होती,म्हणुन ठेचेवर तरी निभावले नाहीतर फ्र्यक्चरच झाले असते"

माईचे हे शब्द ,हा भाव कधीच विसरू नका.असा जेव्हा तुमचा भाव असेल तेव्हा तुमच्या मार्गावर माझी (प.पू.बापू) आई ही दुर्गती हा्रिणीच असेल.
                   ह्याच्या पुढे नाव आहे ते शिवा म्हणजे परम पवित्रता देणारी, परम कल्याण करणारी.नंतर येते ती धात्री...धारण करणारी, आधार देणारी. मग नाव येते स्वाहा..आहुती देणारी, परमेश्वराला अर्पण करणारी. आणि नंतर नाव आहे ते स्वधा..पितरांचे श्राध्द करताना स्वधा काराचे खुप महत्त्व आहे.जे देवांचे पुजन करताना स्वाहा काराचे महत्त्व तेच स्वधा काराचे महत्त्व आहे. तुमचा आत्ताचा जन्म व तुमचे आधीचे सर्व जन्म ह्यांना भक्ती पुरविण्याचे काम स्वधा करते.आम्हांला स्वधा काराचा अर्थ नीट कळला तर आम्हांला ह्या जन्मासोबत आमच्या आधीच्या जन्माचेही पाप नाहिसे करता येते.

स्वाहा ही आधीच्या जन्माचे पुण्य वर्धन करते तर स्वधा आधीच्या जन्मांचे पाप हरण करते.
                    आज कळेल आपल्याला की हा गजर किती महत्त्वाचा आहे.ह्या गजरात तुमच्या ह्या जन्मा बरोबर तुमच्या आधीच्या जन्मांपर्यंत जाण्याची ताकत आहे.जसा गुरुमंत्र तुमचा सांभाळ करणार तसाच हा गजरही करणार आहे. हा गजर प्रत्येकाच्या अंतरंगात उतरला पाहीजे.

कंटाळा आला असेल तर हा गजर नुसताच करा.. सी.डी. न लावता सुद्धा हा गजर करुन बघा...समोर चंडिका आई उभी आहे...असं दृश्य समोर आणा..त्यापुढे आपले बापू, नंदाई आणि सुचितमामा बसले आहेत..बस्स बाकी काही नाही...गजर करताना बेधुंद व्हा, तल्लीन व्हा, बेभान व्हा.जसा एक भोळा वारकरी होतो अगदी तसेच मला इथे प्रत्येकजण आईच्या गजरात तल्लीन झालेला हवा आहे.सगळी दुखणी विसरून जा..मनापासुन गजर करा, अतिशय प्रेमाने.
हरि ॐ
----------------------------------------------------------------------------
** प्रवचनानंतर बापुंनी सांगितले की, उत्सवापर्यंत "जयन्ति मंगला काली.." हा गजर दर गुरुवारी १५ मिनिटे श्री हरी गुरु ग्राम येथे लावला जाणार आहे व प्रत्येकाने ह्या गजरात आनंदाने सामील व्हायचे आहे.

प्रवचनानंतर हा गजर झाल्यावर प.पू.बापूंनी सांगितले की, गजराच्या वेळी "आई"साक्षात येथे उभी होती.आज उत्सवाचे तिला आमंत्रण दिले होते, ते आमंत्रण स्विकारायला ती प्रत्यक्ष इथे आली. आज आली म्हणजे उत्सवाला देखिल येणारच...ॐ नमश्चण्डिकायें.

(Courtesy: http://www.manasamarthyadata.com/)

No comments:

Post a Comment

The Warrior Designed by Templateism.com Copyright © 2014

Theme images by nicodemos. Powered by Blogger.